
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
मुंबई – आयएनएस विक्रांत (INS Vikrant)वरून अडचणीत आलेल्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका करत गंभीर आरोप लावला आहे. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर किरीट सोमय्या हे भूमिगत झाले आहेत, फरार झाले आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना भाजपकडून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गरळ ओकण्यासाठीच भाजप सदावर्ते यांना पैसे देते, असे राऊत यांनी म्हटले. तसेच राऊतांनी सध्या मुंबईत ठाण मांडून बसलेल्या एसटी आंदोलकांबाबतही शंका उपस्थित केली. एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) जाऊन बसले. या सर्व आंदोलकांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीटं कशी आली? त्यांना कोणती यंत्रणा पोसत आहे, मदत करत आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आमचा कामगारांना पाठिंबा आहे. पण कामगारांच्या एका गटाला भडकावून महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राविरुद्ध गरळ ओकण्याचे काम सुरु आहे. याच्यामुळे विरोधी पक्षाला आपण फार मोठी तिरंदाजी करत आहोत, असे वाटत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.