प्रतिनिधी DNA टीम
कर्जत – कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात दहशत पसरवणारा एका आरोपीविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरात घुसून शिवीगाळ व मारहाण प्रकरणी राशीन मधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन जिजाबा साळवे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रमेश प्रल्हाद आढाव (वय-४५) यांनी फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘फिर्यादीच्या सकाळी १० वाजता फिर्यादी पेंटिंग व्यवसायाच्या कामानिमित्त बाहेर जात असताना फिर्यादीच्या पत्नीने फोन करून सांगितले की,’लखन जिजाबा साळवे याने काहीही कारण नसताना फिर्यादीने घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली, त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे चुलते भिकाजी शंकर आढाव यांनी लखन साळवे यास पिंपळवाडी (राशीन) रस्त्याजवळ बोलावून घेऊन ‘तू आमच्या घरी कशासाठी आला होता? तू आमच्या घरी येत जाऊ नकोस’ असे बोलल्याने आरोपी साळवे यास राग आला व त्याने अश्लील शिवीगाळ केली.
फिर्यादी हे लखन साळवे यास ‘शिवीगाळ करू नकोस’ असे म्हणाले असता आरोपी साळवे याने ‘काय करशील तू?असे म्हणत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ‘तू जर परत माझ्या नादी लागला तर तुला जीवच मारून टाकील’ अशी धमकी देत शिवीगाळ करून तेथून निघून गेला.याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याचा शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यात तत्काळ अटक करण्यात आली होती न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असता पाच दिवस तो कोठडीत होता.
दरम्यान कर्जत पोलिसांनी सदर आरोपी नामे लखन जिजाबा साळवे राहणार राशीन याचे विरुद्ध एकूण सहा गुन्हे दाखल असल्याने आणि राशीनमधील सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत असल्याने शिवीगाळ, दमदाटी,मारहाण करत असल्याने तडीपार करण्याबाबत प्रस्ताव माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत उपविभाग व माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे मार्फतीने प्रांताधिकारी कर्जत यांचेकडे पाठविला होता. त्यामध्ये सुनावणी घेऊन त्यास अहमदनगर, बीड, पुणे, नाशिक व सोलापूर या पाच जिल्ह्यांमधून दोन वर्षाकरता मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी कर्जत उपविभाग कर्जत यांनी दोन वर्षाकरता तडीपार केलेबाबत आदेश निर्गमित केले होते, तो आदेश बजावणी कामी मिळून येत नव्हता. अटक केल्यावर सदर आदेशाची बजावणी करून आरोपीस तडीपार करून त्यास 23 मार्च रोजी त्याचे रहाण्याचे ठिकाण सांगीतले प्रमाणे त्यास फलटण येथे सोडण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, संभाजी वाबळे, भाऊ काळे, संपत शिंदे आदींनी केली आहे.
कोणाचेही दादागिरी खपवून घेणार नाही..
कर्जत तालुक्यात कोणीही स्वतःला दादा म्हणून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणे शिवीगाळ करणे दमदाटी करणे आणि वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. सर्वसामान्य नागरिकांनी कर्जत पोलीस स्टेशन, राशीन व मिरजगाव पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार द्यावी. असं आवाहन कर्जत पोलिसांनी केले आहे.