छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान – नितीन भुतारे यांचा आरोप…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान केल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे यांचा आरोप...

अहमदनगर : नगर शहरात नुकतीच छत्रपती शिवराय केसरी (Chhatrapati Shivarai Kesari) कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या समोरच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक अनिल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी केला आहे.
याबाबतचा एक व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे. नितीन भुतारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, एकीकडे निवडणुकीच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray )यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगण्याचे आणि प्रत्येक्षात भर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान करायचा हा दुटप्पीपणा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर हे होत असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी नगर शहरात पुन्हा येऊन महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुढील दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भुतारे यांनी दिला आहे.
पारितोषिक वितरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाची प्रतिकृती देत केली, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ही प्रतिकृती फडणवीस यांना देत असताना एक कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्यासाठी फडणवीस यांच्या कडे येत असताना अनिल शिंदे यांनी त्याला थांबवत पुतळा हाताने बाजूला केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, असे ही भुतारे यांनी म्हटले आहे.