
मुंबई – देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and diesel) किमतीमध्ये वाढ झाली आहे. देशात मागच्या १२ दिवसात दहाव्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी ८० पैशांनी वाढ झाली आहे. आता पर्यंत ७.२० रुपयांची वाढ झाली आहे. (Increase in petrol-diesel rates again; Learn new rates)
भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेल ८५ पैशांनी महागले आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १०२.६१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९३.८७ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत पेट्रोल दरात ८५ पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोल ११७.५७ रुपये आणि डिझेल १०१.७९ रुपये प्रति लिटर झाले आहे. याशिवाय चेन्नईमध्ये इंधन दरात ७६ पैशांची वाढ होऊन, पेट्रोल १०८.२१ रुपये आणि डिझेल ९८.२८ रुपये लिटर आहे. कोलाकातामध्ये पेट्रोल-डिझेलमध्ये ८४ पैशांची वाढ झाली असून पेट्रोल ११२.१९ रुपये आणि डिझेल ९७.०२ रुपये प्रति लिटर झाले आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.