
करंजी – पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावचे माजी सरपंच अनिल गीते व खांडगावचे माजी सरपंच सुरेश चव्हाण यांच्यासह इतर दोघांनी लोहसर येथील काल भैरबनाथ मंदिर परिसरात एका महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसात दाखल झाल्याने लोहसर खांडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोहसर सेवा संस्थेची निवडणूक लागली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाल्याने लोहसरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवार (दि. १८) लोहसर येथील भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये सेवा संस्थेच्या निवडणुकीचे कारण पुढे करत शिवीगाळ करत केसाला धरून खाली पाडून मारहाण केली व अंगावरील कपडे फाडल्याने लोहसरचे माजी सरपंच गीते, खांडगावचे माजी सरपंच सुरेश चव्हाण, सेवा संस्थेचे चेअरमन रावसाहेब वांढेकर, पाराजी वांढेकर सर्व राहणार लोहसर-खांडगाव तालुका पाथर्डी यांच्याविरोधात एका महिलेने पाथर्डी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
संबंधित महिलेने मारहाणीच्यावेळी माजी सरपंच सुरेश चव्हाण याने गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या कारणावरून दोघांनी जबर मारहाण व शिवीगाळ करून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची फिर्याद पाराजी वांढेकर यांनी देवेंद्र गीते, सुखदेव गीते राहणार लोहसर यांच्या विरोधात पाथर्डी पोलिसांत दिली आहे.
काही दिवसांपूर्वी आदर्श गाव म्हणून नावारूपाला येऊ लागलेल्या लोहसरगावात सातत्याने वाद-विवाद सुरू झाल्याने हे गाव पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून पुढे येऊ लागले आहे.