माझ्याशी विवाह न केल्यास तरुणाने दिली तरुणीला धमकी अन् झालं असं काही ..

पुणे – एका 23 वर्षीय तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन विवाह न केल्यास विषारी ओैषध घेऊन आत्महत्या(Suicide) करण्याची धमकी दिली. या प्रकरणात तरूणीच्या फिर्यादीवरून पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीसांनी या प्रकरणात विष्णू विठ्ठल मुंडे (वय २३ रा. भोगलवाडी, जि. बीड) याला अटक केली आहे.
याबाबत तरूणीने फिर्याद दिली आहे. आरोपी विष्णू मुंडे याचे फिर्यादी तरूणीबरोबर प्रेमसंबंध होते. विष्णूने तरूणीच्या आई-वडिलांना शिवीगाळ केल्याने तिने त्याच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. तरुणी कात्रज भागात तिच्या बहिणीच्या घरी राहायला आहे. विष्णूने तरुणीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. माझ्याशी विवाह न केल्यास तुझा विवाह होऊ देणार नाही, अशी धमकी त्याने तरुणीला दिली.
तरुणीच्या बहिणीला शिवीगाळ केली तसेच विवाह न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी तरुणीला दिली. घाबरलेल्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुंडे विरोधात धमकी तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.