
मुंबई – शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीका केली आहे. तसेच काही राजकीय पक्ष राज्यातील वातावरण जाती आणि धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे. याशिवाय, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा या निवास्थानी घेतलेल्या बैठकीबाबत देखील त्यांनी माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तीक असतं. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील.” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले. जशास तसे उत्तर देणं हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. जशास तसं उत्तर आम्ही नेहमीच देत असतो, हे आमचं बाळकडू आहे. काल शिवसेना पक्ष प्रमुखांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी सर्वांची बैठक घेतली. खासदारांची वेगळी बैठक घेतली, प्रवक्तांची वेगळी बैठक घेतली आणि त्यांनी काही नक्कीच सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीने होईल.
पुढे ते म्हणाले महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे, सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आहेत.
या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. यावर आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे की, कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरं जाण्यासाठी तयार आहे. कोणीही समोर येऊ द्या. शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे, हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत.आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही.असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.