कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

सांगली- भरधाव कंटेनर आणि कारची धडक झाल्याने कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटातील हॉटेल अमर समोरील धोकादायक वळणावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.
या भीषण अपघातामध्ये आदगोंडा बाबू पाटील (वय 55), छाया आदगोंडा पाटील (वय 51), महेश देवगोंडा पाटील (वय 23, तिघेही रा. बोरगाववाडी, ता. निपाणी) आणि चंपाबाई बाळेशा मगदूम (वय 80, रा. राशिवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कंटेनर चालक द्वारकासिंग ऊर्फ पार्श्वनाथसिंग (वय 53, रा. बिहार)हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
कंटेनरने कारला सुमारे 200 फूट फरफटत नेल्याने जागीच ठार झालेल्या चौघांचे अडकून पडलेले कारमधील मृतदेह पोकलेनच्या साह्याने बाहेर काढावे लागले. पुतणीच्या लग्नाला निघालेेले चुलत-चुलती, लग्न असलेल्या मुलीचा भाऊ व चुलत आजीचा मृतांत समावेश आहे. काही अंतरावरच असलेल्या कार्यालयात जाण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
कोडणी (ता. निपाणी) येथील माजी ता. पं. सदस्य सदाशिव बुदिहाळे यांचे पुतणे विनायक बुदिहाळे यांचा विवाह बोरगाववाडी (ता. निपाणी) येथील देवगोंडा बाबू पाटील यांची कन्या मयुरी हिच्याशी ठरला होता. हा विवाह सोहळा शुक्रवार दि. 26 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्तवनिधी येथील मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता.
शुक्रवारी सकाळी कार सर्व्हीस रोडमार्गे स्तवनिधी येथे मंगल कार्यालयाकडे जात होती. महेश हे कार चालवत होते. दरम्यान, त्यांची कार मंगल कार्यालयाच्या वळणावर आली असता महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला व कंटेनरची कारला जोरात धडक बसली. मयत चौघांवर बोरगाववाडी येथे एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.