
आज सकाळी नऊच्या सुमारास दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार होते. त्यामुळे कालपासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. नवनीत राणांनी दिलेल्या आव्हानानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
तर दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या खारमधील इमारतीत शिवसैनिक घुसले आहेत. सकाळपासून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्यांनी घराबाहेर पडण्याची वेळ दिली होती. पण त्याचवेळेस शिवसैनिकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
मातोश्रीच्या बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रीपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याची वाट पाहत आहे. कितीही विरोध झाला तरी आज मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.