
मुंबई – राज्यात मान्सूनचा (Monsoon) आता आगमन झाले आहे. यातच मागच्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काल रात्री मोठा दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे.
यातच आता भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार मुसळधार पाऊसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढचे ५ दिवस देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अहमदनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.