
श्रीगोंदा :- बंदी असूनही शहरात सर्वत्र गुटखा, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत आहेत. पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे. यामुळे तालुक्यात बंदी कागदावरच असल्यामुळे बेकायदा गुटकाविक्री जोमात सुरू आहे.
शासनाचे श्रीगोंदयातील पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नगरपालिका प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटकाविक्री जोरात सुरू आहे. श्रीगोंदा शहरात कर्जत व राशीन मार्गे गुटखा येत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील ठराविक व्यक्ती नियमीतपणे व राजरोसपणे गुटक्याची वाहतूक करीत आहेत.
पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. गुटखा शहरात आल्यानंतर ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो. तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो. गुटख्याच्या एका पुडीची किंमत १५ ते २० रुपये आहे. गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात आहे. श्रीगोंदयाच्या ग्रामीण भागातील खरेदीदारांना श्रीगोंदा शहरातील किराणा मालाच्या दुकानातून गुटखा पुरविला जातो. या महिन्यात लॉकडाउनच्या भितीने अनेकांनी गुटक्याचा साठा करून ठेवला आहे. शहरातील अनधिकृत टपऱ्या, छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटकाविक्री केली जाते.
एक पानटपरीधारक महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करतो. शहरातील अनधिकृत टपरी व बांधकामांवर नगरपालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैध धंदेही सुरू होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग श्रीगोंदा तालुक्यात फिरकतच नाही आणि पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते. आणि अवैध विनापरवानगी बांधकामांवर नगरपालिका कारवाईच करीत नाही. यामुळे हा अनधिकृत व्यवसाय सर्रास सुरु आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी हजारो रुपये किमतीचा गुटखा पकडला होता. त्यानंतर श्रीगोंदयात एकही कारवाई झालेली नाही.