गुटखा विक्री दारात, माफियांचा व्यवसाय जोरात!

श्रीगोंदा ,:- करोना विघ्नाने सर्वच क्षेत्रातील व्यावसायिकांना ‘बुरे दिन’चा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे ‘अच्छे दिन’ बघायला मिळाले आहेत. लॉकडाउनच्या काळातही चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री धडाक्यात सुरू होती व आहे , या गोरखधंद्यास आळा घालण्यास पोलिस व औषध प्रशासन कमी पडले आहे. गुटखा माफियांसोबतच या दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमाई होत असल्याची चर्चा आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनसह संचारबंदी लागू होती. या काळात संपूर्ण उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात झोननुसार शिथिलता मिळाल्याने काहीअंशी उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, लॉकडाउनच्या काळात सर्वच छोटे-मोठे उद्योग बंद असताना गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरट्या मार्गाने वाहतूक व विक्री सर्रास सुरूच होती व आहे यामुळे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मात्र आर्थिक भरभराट झाली. त्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांतून रात्रीत गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ विशिष्ट स्थळी पोहचवले जात होते. या व्यवसायातील माफियांनी खोऱ्याने कमाई केली आहे.
गुटखा विक्रीचे हॉटस्पॉट
शहरातील विविध ठिकाणी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुटखा माफियांचे अड्डे लॉकडाउनच्या काळातही राजरोस सुरूच आहेत. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर तर आजही दिवसाढवळ्या गुटख्याची वारेमाफ विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असल्याने वाहतूक व विक्री ही चोरट्या मार्गानेच होते. शहरालगत हद्दीच्या बाहेर नगर दौंड महामार्गालगतच्या गावांत गुटख्याचा साठा करण्याची ठिकाणे आहेत. काही व्यापारी तर गुटख्याची ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत.
मागील दाराने राजरोस विक्री
लॉकडाउनमध्ये पानटपऱ्या नावालाच बंद होत्या. सर्व पानटपरीधारक राहत्या घरातून व्यवसाय करीत होते. आता खुलेआम सुरू आहे यात गुटख्याचा व्यवसाय सध्या प्रचंड तेजीत होता व आहे. काही पानटपऱ्या मागील दाराने राजरोस सुरू होते. या सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिस डोळेझाक करीत होते याबद्दल नागरिकांतून तर्क वीतर्क लढविले जात आहेत
नाव न घेण्याच्या अटीवर सांगितली माहिती
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक पोलीस शिपाई आणि वरिष्ठ अधिकारी गुटखा प्रकरणात सामील आहेत पण कायम दुसऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव बदनाम करून आपली बाजू सावरून पुन्हा तीच भूमिका पार पाडण्यात काही पोलीस तरबेज आहेत अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलीस कर्मचारी यांनी दिली आहे