
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – एकीकडे मागच्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे तर आता दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राज्य सरकारवर आमची हत्या (Murder)करण्याचा कट रचला जात असून इतरही कष्टकऱ्यांचा मृत्यू व्हावा, अशी सरकारची इच्छा असल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Related Posts
सरकारला आमच्या हत्येचा कट रचून एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची सुनावणी न्यायालयात होऊ द्यायची नव्हती आणि कष्टकऱ्यांचे अधिकाधिक मृत्यू कसे होतील, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात होते, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने उद्या सकाळी एसटी विलीनीकरणाबाबत सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीवेळी मी सरकारची पोलखोल कशी करतो हे तुम्ही बघाच. सरकारच्या हुकूमशाहीचे, एकाधिकारशाहीचे आणि गैरवर्तणुकीचे पुरावे मी कागदपत्रांसह उद्या समोर आणणार आहे आणि एसटी कामगारांचा विलीनीकरणाचा लढा विजयाकडे नेणार आहे,असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी हत्येच्या कटाचा आरोप करताना राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘आम्ही नवाब मलिक यांच्या विरोधात आहोत, आमच्या याचिकेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली आणि आता जयश्री पाटील यांनी विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमच्या हत्येचा कट रचला आहे,’ असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.