
मुंबई- आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही अशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं
मीदेखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे. प्रत्येकजण कुठला तरी पालकमंत्री असतो. महाविकास आघाडीसारखा प्रयोग राजकीयदृष्ट्या आणि विकासासाठी यशस्वी ठरला आहे. काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढलेले असतात तिथे ही खदखद असते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून या नाराजी दूर करतात. राजकारणात थोडं पुढे मागे हे चालत राहतं. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत हे महत्वाचं आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सत्तेतून बाहेर पडण्यासंबंधी त्यांचं मत वैयक्तिक असेल. पण अर्थसंकल्पात आत्ताही आणि आधीही सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न आहे. नाराजी साहजिक असते पण ती दूर करण्याचा प्रयत्न आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.