जिल्ह्यात खळबळ; दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

पहिल्या घटनेत राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते . दि. २२ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ती मुलगी मोबाईलला बॅटरी टाकून येते, असे सांगून घरातून बाहेर गेली होती. मात्र, ती उशिरापर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. त्या मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुनील निकम करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत एक १५ वर्षीय मुलगी तिच्या कुटूंबासह राहुरी फॅक्टरी परिसरात राहते. दि. २३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे घरातील काम आवरल्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेले. रात्री नऊ ते पहाटे तीन वाजे दरम्यान ती १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. अखेर त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार कथन केला. त्यांनी राहरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमां विरोधात त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गर्जे करीत आहेत. राहुरी फॅक्टरी येथून दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेल्याने या परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली आहे.(Excitement in the district; Kidnapping of two minor girls in two days)