
श्रीगोंदा – बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमाला गती आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील १८ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी ११ जून रोजी मतदान व याच दिवशी मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर मतमोजणी होणार आहे.
निवडणुकांचे बिगूल वाजले असताना या सर्व संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे तालुक्यात महत्त्व प्राप्त असलेल्या बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेसाठी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ सहकार विकास पॅनेल ने १३ जागांसाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.
यावेळी बोलताना अण्णासाहेब शेलार म्हणाले की,अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत महत्वाची आणि मोठी असलेल्या या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या कर्ज माफीचा सुमारे १४ कोटी ५० लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला असून सोसायटीचा चेहरामोहरा बदलून सोसायटीला एका प्रगतीच्या उंचीवर नेत सोसायटीची प्रशस्त इमारत बांधली आहे.
२५ वर्ष सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवून हि संस्था एकहाती देण्याचे काम केले आहे परंतु राजकीय आकसापोटी काही राजकीय नेते हस्तक्षेप करू पाहत असल्याने चांगल्या चाललेल्या कारभारात बाहेरच्यांनी येवून ढवळा ढवळ करत राजकारण करण्याचे उद्योग करू नये असा सल्ला त्यांनी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचा नामोल्लेख टाळून केला.त्यामुळे बेलवंडी सेवा संथेची निवडणूक हि संघर्षाची होण्याची शक्यता आहे.