‘पोटासाठी’ नाचतो डोंबारी

0 14
 श्रीगोंदा ;-  काही कला आपसूकच केवळ उदरनिर्वाहाचं साधन ठरतात. कोल्हाटी समाजाचा ‘डोंबारी’ हा खेळ व नृत्यप्रकार या गटात मोडतो. वेडयावाकडया उडया मारत समोरच्यांची प्रशंसा करत पोटाची खळगी भरणं, या संकुचित मानसिकतेत गेली कित्येक वर्षे हा समाज खितपत पडलाय. विकास आणि आधुनिकतेचा स्पर्शही न झालेला असा हा डोंबारी समाज.. कितीही संकटं आली तरी (प्रसंगी उपाशी पोटी) ‘नाचतो हा डोंबारी’ रस्त्यावरच्या एका कोप-यात, रश्शीवरच्या उडया, कोंबडयाप्रमाणं उडय़ा, मध्येच ढोलकीच्या तालावर ठेका धरत एखादी कसरत दाखवणारी टोळी दिसली की, हा डोंबा-याचा खेळ बघायला येणा-या-जाणाऱ्यांची पावलं आपसूकच थांबतात.
नाच व खेळ यांचा सुरेख संगम साधत मनोरंजन या उद्दिष्टापासून थोडी फारकत घेत, केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी जन्माला आलेली कला म्हणजे ‘डोंबारी कला’.खरं तर डोंबारी नृत्य हे रंजकप्रधान नृत्यप्रकारात मोडतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात आढळणा-या कोल्हाटी या भटक्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी ही लोककला कसरतींसह सादर होणा-या नृत्यासाठी ओळखली जाते. 
 
प्राचीन काळापासून काही कला आपसूकच उदरनिर्वाहाच्या उद्दिष्टानं निर्माण झाल्या आहेत. काही माकडचाळे केले की रस्त्यावरची माणसं कुतूहलानं पाहत खिशातली नाणी पदरात टाकतात. या पैशातूनच कसंबसं दोन वेळंच खाणं निभावून नेणा-या कोल्हाटी जमातीनं ही कला नावारूपाला आणली. दोरीवरून चालणं, नाचणं, उडय़ा मारणं वगैरे कसरतींचे खेळ करणं आणि भिक्षा मागणं हा कोल्हाटी जमातीचा पारंपरिक व्यवसाय. बार्शी तालुक्यातील माणकेश्वर हे कोल्हाटयांचं मूळ गाव.‘कोला’ या नावाच्या पुरुषापासून आपली उत्पत्ती झाली, असं ते सांगतात. या कोलावरूनच त्यांचे वंशज कोल्हाटी या नावानं ओळखले जाऊ लागले. काही ठिकाणी खेळकरी या नावानं ही जमात ओळखली जाते. मराठी, गुजराती, पोटरे, पाळ, काने, हरका, वने किंवा वलियर, गोपालगणी या डोंबारी जमातीतील पोटजाती आहेत. खरं तर ही जात अनेक जमातींच्या मिश्रणातून बनलेली आहे. मराठे, सोनार, शिंपी, लोहार या जातींचा देखील कोल्हाटी जमातीत समावेश होतो. 

मैत्री तोडली म्हणून तरुणीवर चाकूने हल्ला, तरुणावर गुन्हा दाखल  

 
डोंबारी हे गावाबाहेर झोपडया बांधून राहतात.डुक्कर वा गोमांसाचा आहारात समावेश असल्यामुळे या समाजाबाबत मुख्य सामाजिक प्रवाह थोडा फटकूनच वागत होता.नृत्य, गायन या कलांवर आधारित कसरती (डोंबारी नृत्य) ही कोल्हाटी समाजाची समाजमनातील ओळख. त्यांच्या या कलेचा इतिहास अगदी पेशवेकालापासून आढळतो. आपल्या कसरतीच्या नैपुण्यामुळे कित्येक पेशव्यांनी त्यांना जमिनी भेट स्वरूपात दिल्याची नोंद आहे. आपल्या कसरती कलेतील प्रामाणिकता जपत त्यांनी पिढय़ान्पिढय़ा ही नृत्यकला हस्तांतरित करत अद्याप जपली आहे.मुळात ही भटकी जमात असल्यानं जिथं-जिथं जत्रा होतात, त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम असतो. त्यानंतर मैलोन्मैल पायी प्रवास करताना काही माणसांची टोळी आढळली, की आसपास पुन्हा तात्पुरता मुक्काम करत डोंबारी नाच करतात आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो. मात्र अशा भटक्या जीवनातूनच या कोल्हाटी समाज लावणी या नृत्यकलेकडे वळला. आपल्या नृत्यकलेला अधिक व्यापक, काहीसं ठसकेबाज स्वरूप द्यावं, यासाठी काही जणांनी या लावणी कलेचा स्वीकार केला. मात्र काही डोंबारी कलेवर खिळून राहिले.कोल्हाटी चटया, फण्या, खेळणी या कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करतात. 
Related Posts
1 of 1,292

बाळ काही बोलेना … आणि तो मी नव्हेच ……..

 
काही स्त्रिया गोंदण्याचा व्यवसाय करतात. या जातीला मुळातच मागासलेपणाचा शाप आहे. नवप्रवाहाचा स्पर्श अद्याप या जातीपर्यंत पोहोचला नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बहुतांश लोकांचा योगक्षेम कोल्हाटी समाजातील स्त्रियांच्या वेश्याव्यवसायावर चालतो. वयात आल्यावर मुलामुलींची लग्ने आटोपली जातात. मुलीचे लग्न केलेच पाहिजे, असं बंधन नसल्यानं ‘तू वेश्याव्यवसाय करणार की लग्न करणार, असा प्रश्न त्यांना विचारला जातो.लग्नास होकार दिला तर ठीक, तिने वेश्याव्यवसाय स्वीकारण्याचं ठरवलं तर जातिसभेची परवानगी तिला वेश्या म्हणून जाहीर केलं जातं. केवळ पोटात दोन वेळंच अन्न भरण्यासाठी समोरच्याने ओंजळीत पैसे फेकावे व बदवल्यात त्यांना ‘मनोरंजन’ मिळावं, यासाठी पडीक कामं करण्यावर आजही त्यांचा विशेष भर आढळतो. 

मंत्रिमंडळात होणार फेरफार ? नाना पटोले यांनी दिली ही प्रतिक्रिया….. 

या समाजाला शहरीकरणाचं वारं घोंगावत नाही असे नाही. शहरी भागात येऊनदेखील कसरतीच्या उडय़ा मारत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे दिसत होते. आता प्रेक्षकांसमोर मुळात मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.फाटके कपडे, शिळे अन्न रस्त्यावरच कुठेतरी कोप-यात बसून खाणा-या या जमातीच्या कसरती चाळ्यांपेक्षा सिनेमागृह, मॉल अशी ठिकाणे आता मनोरंजनासाठी, विरंगुळ्यासाठी उपलब्ध असल्याने आता पोटाचा चिमटा मोठा झाल्याचं त्यांच्या परिस्थितीवरून जाणवंत. राहण्यासाठी ना पक्क घर, शिक्षणाचा अभाव, अविकासाच्या दारिद्रयात लोटल्या गेलेल्या या जमातीपुढे आता कोणता पर्याय निवडावा, याचं उत्तर अनुत्तरितच आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: