नात्याला काळिमा ! अल्पवयीन भाचीवर सावत्र मामानेच केला तीन वेळा अत्याचार

औरंगाबाद – औरंगाबाद (Aurangabad) मधील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सावत्र मामाने अल्पवयीन भाचीवर (minor niece) तीन वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती कुटुंबासह राहते. त्यास चार पत्नी होत्या. त्यातील दोन पत्नी मयत झाल्या आहेत. पहिल्या पत्नीला दोन मुले, दुसऱ्या पत्नीला दोन मुली आहेत. तिसरी पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने चौथे लग्न केले. दुसऱ्या पत्नीच्या दोन मुलींपैकी एक जण आजीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी ती वडिलांकडे राहण्यास आली. २५ एप्रिल रोजी चौथ्या पत्नीचा भाऊ हा बहिणीकडे आला होता. तेव्हा त्याने १३ वर्षीय सावत्र भाचीवर सायंकाळी ५ वाजेनंतर जबरदस्तीने तीन वेळा अत्याचार केले. या अत्याचारामुळे घाबरलेल्या मुलीने त्या दिवशी कोणालाही काही सांगितले नाही. तिला त्रास होत असल्यामुळे सतत रडत होती. त्यामुळे वडिलांनी तिला पहिल्या पत्नीच्या मुलास बोलावून घेत आजीकडे घेऊन जाण्यास सांगितले.
आजीकडे जाताना पीडितेने सावत्र भावास घडलेला प्रसंग सांगितला, तसेच आजीलाही घरी पोहोचल्यावर घटना सांगितली. त्यानंतर मुलीची आजी, चुलत्याने थेट उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठत २८ एप्रिल रोजी तक्रार दिली. त्यानुसार निरीक्षक गीता बागवडे यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक व्ही.बी. गायकवाड करीत आहेत. दरम्यान, मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, तसेच फरार आरोपीच्या शोधासाठी एक पथक तैनात केले आहे.