प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणात दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य;म्हणाले चौकशीचे ..

प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – आज सकाळी आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचा मुत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चंना उधाण आले आहे. यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकरणात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गृहमंत्री दिलीस वळसे-पाटील यांनी प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचा मृत्यू कसा झाला याची चौकशी केली जाईल, असे जाहीर केले आहे. साईलच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
आता पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात काही नवा खुलासा होणार का, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. प्रभाकर साईलला शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. प्रभाकर साईल याचा मृत्यू तुर्तास नैसर्गिक वाटत असला तरी त्याच्या निधनामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल याच्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती.
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) अटक केली होती. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अन्य आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा पंचनामा केला होता. त्यावेळी प्रभाकर साईल हा त्याठिकाणी पंच म्हणून उपस्थित होता. मात्र, नंतरच्या काळात प्रभाकर साईल याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.