
Ahmednagar crime:- नगर: गावात चोरी झाल्यास जमाव येऊन घरावर हल्ला करून जाळपोळ केली जात असून, याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घेतली जात नाही. घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी कौंडा (ता. नगर) येथील पारधी समाजाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन सुमनबाई सावध भोसले यांच्या कुटुंबीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कौंडा गावात चोरी झाल्यास गावातील लोक जमावाने वस्तीवर येतात व हाणामारी करतात. तुम्ही इथे राहू नका, तुमच्याशिवाय दुसरे चोर दिसत नाहीत, असे म्हणत गावातील काही लोकांनी यापूर्वीही पारधी समाजाच्या वस्तीवर हल्ला केलेला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घेतली नाही. उलटपक्षी मुलांवर खोटे गुन्हे दाखल करून, त्यांना जेलमध्ये घातले. या भीतीने मुले शेतात झोपतात. गेल्या शनिवारी (दि. १९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० लोकांचा जमाव घरावर चालून आला. त्यातील काहींनी आमच्या गायी कुठे आहेत. तुम्हीच गायी चोरल्या आहेत, असे म्हणत कुटुंबातील लोकांचा पाठलाग करत मारहाण केली, तसेच घराचे नुकसान केले असून, महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. जातीय वाचक शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली. गावातील लोकांपासून भीती असून, संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.