
दिल्ली – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Musewala) यांची सुरक्षा कमी करण्याच्या निर्णयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कालच्या डीजीपींच्या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण मागितलं आहे. राज्य सरकार तपासात पूर्ण सहकार्य करेल, कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, आज सिद्धू मुसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून त्यांच्या मुलाच्या हत्येची केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (CBI) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (NIA) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हल्ल्याच्या वेळी तो आपल्या मुलाच्या गाडीच्या मागे होते 28 वर्षीय गायकाच्या वडिलांनी सांगितले की, “धमक्यांमुळे बुलेटप्रूफ वाहन विकत घेतले होते. मात्र रविवारी सिद्धू त्याच्या दोन मित्रांसह त्याच्या सुरक्षा कर्मचार्यांसह दुसऱ्या वाहनात निघून गेला. नंतर मी दोन्ही जणांसह त्याचा पाठलाग केला. पण मी घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुन्हेगारांनी माझा मुलगा आणि त्याच्या दोन साथीदारांवर गोळ्या झाडल्या होत्या.
बलकौर सिंग यांनी मुलाच्या हत्येची तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, “रस्त्यावर एक एसयूव्ही आणि सेडान गाडी थांबली होती. त्यामध्ये चार सशस्त्र लोक होते. मूसवाला यांचे वाहन त्यांच्याजवळ येताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही मिनिटांनंतर त्यांनी तिथून पळ काढला. मी आरडाओरडा करू लागलो आणि लोक जमा झाले. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना रुग्णालयात नेले, तिथे त्याचा मृत्यू झाला.”
पंजाब पोलिसांनी सिद्धूच्या वडिलांच्या वक्तव्यावरून हत्येचा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पंजाब सरकारने नुकत्याच केलेल्या सुरक्षा आढाव्यात मूसवाला यांना देण्यात आलेल्या चार सशस्त्र सुरक्षा रक्षकांपैकी दोन मागे घेतले होते. त्यामुळे आता मोठा राजकीय वादही निर्माण झाला असून, विरोधी पक्षांनी भगवंत मान सरकारवर व्हीआयपी लोकांना संकटात टाकल्याचा आरोप केला आहे.