नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना साडीचोळी देऊन हभप दिपक महाराज यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी – अशोक निमोणकर
जामखेड – जामखेड येथील भक्ती-शक्ती महोत्सवाचे आयोजक हभप दिपक महाराज गायकवाड यांचा वाढदिवस भक्ती महोत्सव समितीच्या सदस्यांनी जामखेड नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना साडीचोळी भेट देऊन साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने दुर्लक्षित घटकांचा साडीचोळी देऊन सन्मान व सत्कार यामुळे एक नवीन पायंडा पाडण्यात आला आहे.
हभप दिपक महाराज गायकवाड हे मागील १५ वर्षापासून शहरातील सर्व घटकांना बरोबर घेऊन भक्ती शक्ती महोत्सवाच्या वतीने नामांकित कीर्तनाकारांचा लाभ जामखेड वासीयांना करून देत आहे. एक वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावमुळे त्यामध्ये खंड पडला होता. यावर्षी तो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. आयोजक दिपक महाराज यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भक्तीशक्ती महोत्सवचे अध्यक्ष सोमनाथ पोकळे, नगरसेवक अमित चिंतामणी अँड. प्रवीण सानप डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. वैभव तांदळे, डॉ, भारत दारकुंडे पंढरीनाथ महाराज राजगुरू, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक संचालक दत्तात्रय सोले पाटील यांनी पुढाकार घेतला.
जामखेड नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांना साडीचोळी देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी म्हणाले, आमचे मार्गदर्शक हभप दिपक महाराज यांनी अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात संघटन करून एक वेगळी दिशा देत असून भक्ती शक्ती महोत्सव हा त्याचा एक भाग आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सफाई कामगारांना साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला आहे. यापुढील काळात त्यांच्याकडून अशीच सेवा घडो अशी इच्छा व्यक्त केली.
हभप दिपक महाराज यावेळी म्हणाले भक्ती शक्ती महोत्सव पदाधिकारी व सदस्यांनी वाढदिवसाचा घाट घातला. पण तो स्विकारताना जामखेड शहर स्वच्छ ठेवण्याची कामगिरी पहाटे पाच वाजता करणा-या या सर्व कामगारांचा सत्कार करावा अशी इच्छा होती. कोरोनाच्या काळात त्यांनी हे अवघड काम करून खरे कोरोना योद्धे दिसून आले. त्यामुळे थोडीफार उतराई म्हणून साडीचोळी देऊन सत्कार भक्ती शक्ती महोत्सवाचा पदाधिकारी व सदस्यांनी केला याबद्दल आभार व्यक्त करून आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राचे काम यापुढे कायमस्वरूपी चालू ठेवू अशी ग्वाही हभप दिपक महाराज गायकवाड यांनी दिली.
यावेळी हभप हरिदास गुंड राजू गायकवाड, संदीप सांगळे, संतोष राऊत, अमित पोटे, गणेश काळे, उमाकांत कुलकर्णी सर व संभाजी मुळे उपस्थित होते.