प्रवासात सोने चोरताना दोन महिलांना पकडले; गुन्हा दाखल

अहमदनगर – रिक्षाने प्रवास करणाऱ्या पती-पत्नीच्या बॅगमधील साडेआठ तोळ्याचे दागिणे चोरणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालन ऊर्फ शारदा हारकू भोसले (वय ४० रा. शेवगाव) व भाग्यश्री जगदीश काळे (वय २०. रा. घोटन ता. शेवगाव) अशी पकडलेल्या महिलांची नावे आहेत.
या प्रकरणी मुंबई पोलीस दलात असलेले अशोक जिजाबा काळे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. फिर्यादी काळे हे त्यांच्या कुटुंबासह रिक्षाने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथून अहमदनगरकडे येण्यासाठी निघाले होते. रिक्षाच्या मागिलबाजूला त्यांनी दोन बॅगा ठेवल्या होत्या. त्याठिकाणी दोन महिला बसल्या होत्या. त्या महिलांनी बॅगमधून दागिणे काढून घेतले.
हा प्रकार फिर्यादी यांच्या पत्नीच्या लक्षात आला. सदर महिलांना, ताब्यात घेऊन फिर्यादी भिंगार पोलीस ठाण्यात आले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश नागरगोजे, अजय नगरे, राहुल द्वारके, भानुदास खेडकर, कोमल जाधव यांनी महिलांकडे चौकशी केली. त्यांच्याकडे सोन्याचे दागिणे आढळून आले. पोलिसांनी ते सर्व हस्तगत करून त्यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.