
जळगाव – गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणानंतर भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात युती होणार असल्याची चर्चा जोराने सुरु होत आहे. याच दरम्यान भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मनसे आणि भाजप युतीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजप मनसे युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील मात्र कालानुरूप पुढे काय काय घडेल हे लवकरच कळेल’ असं सूचक वक्तव्य माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने अनेक चर्चंना उधाण आले आहे.
‘खोटं बोल पण नेटाने बोल ही म्हण संजय राऊत यांना तंतोतंत लागू होते. संजय राऊत यांनी आतापर्यंत ज्या डरकाळ्या फोडल्या त्यातील एकही गोष्ट सत्य झाली नसून केवळ वल्गना करत असून केवळ प्रसिद्धीसाठी मोठ्याने ते बोलत होते. मात्र आता सर्व कागदपत्र तपासणी होईल, त्या नंतर सर्व समोर येईल, काहीतरी असल्याशिवाय ईडी कार्यवाही करून प्रॉपर्टी पर्यंत जाणार नाही. त्यांचे पाप पुण्य राज्याच्या समोर आले असून त्यांना आता कुठलीही सहानुभूती मिळणार नसल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले पेन ड्राईव्हमधून आम्ही फोनची टॅपिंग नाही तर पूर्ण पिक्चर समोर आणला आहे. कसेही करून भाजप नेत्यांना संपवायचं हे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समोर आले आहे त्यामुळे त्यांनी आता एसआयटी नेमली किंवा अजूनही काही कमिटी नेमली तरी खरे-खोटे हे जनतेसमोर येईलच, असंही गिरीश महाजन म्हणाले. महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री हे जेलमध्ये जाऊन बसले आहेत, त्यामुळे राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. अनेक पोलीस अधिकारी जेलमध्ये गेले आहे, अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करत आहेत. मात्र यांच्याकडे मुख्यमंत्री ढुंकूनही बघत नाही, असं म्हणत राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.