
मुंबई – मागच्या ५० दिवसांपासुन जास्त कालावधी पासुन सूरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल (Russia and Ukraine War) मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे युद्धग्रस्त युक्रेनला भेट देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
जो बायडेन हे युक्रेनमध्ये जाऊन युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा रशियासाठी मोठा धक्का असणार आहे, अशा चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. बायडेन यांच्या युक्रेन भेटीसंदर्भात तर्क वितर्क लढवले जात असतानाच आता यासंदर्भात थेट व्हाइट हाऊसनेच स्पष्टीकरण जारी केलं आहे.
बायडेन यांच्या संभाव्य युक्रेन दौऱ्याची शक्यता व्हाइट हाऊसने फेटाळून लावलीय. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची किव्हमध्ये भेट घेण्यासंदर्भात बायडेन यांचा कोणताही विचार नसल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) यासंदर्भातील खुलासा केल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलंय.
राष्ट्राध्यक्षांचा असा कोणताही दौरा नियोजित करण्यात आलेला नाहीय,” असं उत्तर पास्की यांनी बायडेन प्रशासन अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतने एक विशेष उच्च स्तरीय बैठक थेट किव्हमध्ये घेणार असल्याच्या प्रश्नावर दिलंय. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला ८०० मिलियन अमेरिकन डॉलर्स किंमतीची लष्करी मदत देणार असल्याची घोषणा केलीय. यामध्ये वॉशिंग्टनने मोठ्या आकाराची शस्त्र पुरवणार असल्याचं स्पष्ट केलं असून पूर्व युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात रशियाकडून हल्ल्यांची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मदत दिली जाणार आहे.
आतापर्यंत अमेरिकने चार विमानांमधून युक्रेनला सुरक्षेसंदर्भातील मदतीचं सामान पाठवलं असून आज पाचवं विमान पाठवल जाणार आहे असं पास्की म्हणाल्यात. “एकूण चार विमानांमधून या आठवड्याच्या शेवटी युक्रेनला मदत पाठवण्यात आलीय. आणखी एक विमान आज रवाना होणार आहे,” असं पास्की यांनी म्हटलंय.