
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
शिंदेंनी काढलेल्या आदेशामुळे कोकणात मनसेला धक्का बसला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. वैभव खेडेकरांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर शिंदेंनी खेडेकर यांना अपात्र ठरवलं. नगराध्यक्ष म्हणून वैभव खेडेकर मनमानी पद्धतीनं कारभार करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला होता.
खेडेकर यांच्या विरोधात विकास खात्याकडे तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. त्यामुळे खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलं. खेडेकर कोणाताही निर्णय घेताना कोणालाच विश्वासात नव्हते, असे आरोप अनेकांनी केले होते. त्यामुळे खेडेकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. अपात्रतेची कारवाई होताच खेडेकरांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. मी नगरविकास खात्याचा आदेश पाहिला. राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला आहे. त्यामुळे ही गोष्ट मला अपेक्षित होती. मला शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र मी शिवसेनेत गेलो नाही. त्यामुळेच ही कारवाई झाल्याचा दावा खेडेकरांनी केला. नगरविकास मंत्र्यांनी काढलेल्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.