
श्रीगोंदा – मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्याने ऐनवेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी गटाने निवडणुकीपूर्वी कथित शॉपिंग सेंटर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दिनांक १४ मे रोजी ठेवला होता मात्र १२ मे ला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली व सभासदांच्यात हवा करण्यासाठी ठेवलेला भूमिपूजन कार्यक्रम गुंडाळण्याची वेळ आली.
मागील काही दिवसांपूर्वी मढेवडगाव सेवा संस्थेच्या अनियमित कारभारामुळे चार संचालकांना पायउतार होऊन घरी बसावे लागले. काही सभासद शेतकऱ्यांनी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत वेळोवेळी उपोषण, आंदोलने करत संस्थेला कायद्याचे झटके दिले आहेत. अंतर्गत राजकारणाने अनेक सभासदांवर अन्याय होत असल्याने सहकार आयुक्त, जिल्हा सहकार निबंधक व तालुका सहाय्यक निबंधक यांनी वेगवेगळ्या निकालात संस्थेवर ताशेरे ओढून चौकशी सुरू केली आहे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या कुरबुरीने एकमेकांविरोधात वाद, प्रतिवाद सुरू असतानाच निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी गटाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार जिल्हा बँक संचालक राहुल जगताप, जिल्हा बँक संचालक अनुराधाताई नागवडे, साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस व गावातील सर्व पक्षीय मान्यवर संस्थेचे सर्व सभासद यांच्या उपस्थितीत दिनांक १४ मे रोजी संपन्न होणार होता परंतु अचानक संस्थेचा निवडणूक कार्यक्रम १२ मे रोजी प्रसिद्ध झाल्या कारणाने निवडणूक आचारसंहिता १२ मे पासून लागू झाली आहे त्यामुळे कार्यक्रम स्थगित करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली आहे.
आता निवडणुकीच्या रणधुमाळीत सेवा संस्थेवर नेमके कुणाचे वर्चस्व राहिल हे तटस्थ सभासद मतदार ठरवणार असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप मागील काही दिवसापासून जोरदार सुरू होते. त्यातच बिनविरोध निवडणुकीची चर्चाही रंगू लागल्याने आता नेमका निकाल काय लावायचा आणि संस्थेचे सूत्र पुन्हा कुणाच्या हातात जाणार हे येत्या १८ जून रोजीच्या मतदानात कळणार आहे.