मनपाच्या व्हॉलमनला मारहाण; कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगर – महापालिकेच्या दोन व्हॉलमनला (Wallman)शिवीगाळ, दमदाटी करत एकाला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, दमदाटी, शिवीगाळ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गुप्ता (पूर्ण नाव माहिती नाही, रा. तापीदास गल्ली, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
हरिभाऊ एकनाथ काळे (वय ३८ रा. दत्त चौक, भूषणनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या व्हॉलमनचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी काळे मंगळवारी सकाळी ९:५० वाजता तापीदास गल्ली येथे व्हॉलमन मल्लेश संताराम संभार यांच्यासह पाणी सोडण्याचे काम करण्यासाठी गेले होते. तेथे विजय गुप्ता हा आला व फिर्यादी यांना म्हणाला, ‘तुम्ही पाणी कमी दाबाने का सोडता? आमचा व्हॉल तुम्ही व्यवस्थित सोडत नाही’, त्यावेळी फिर्यादी त्याला म्हणाले, ‘लाईट अडचणीमुळे मुळा डॅम येथील पंप बंद झाले आहेत. अर्धा तासात तुमच्या भागात पाणी येईल’. गुप्ता याने फिर्यादीला त्याच्या घरी नळ कनेक्शन तपासणीसाठी नेले तर नळ कनेक्शन व्यवस्थित होते. त्यावेळी गुप्ताने फिर्यादीला थोड्यावेळापूर्वी काय म्हणाला, असे म्हणत, ‘तुझ्याकडे पाहतो’, म्हणून त्यांना शिवीगाळ करत त्यांची गाडी ढकलून दिली. बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्यासोबत असलेले दुसरे व्हॉलमन संभार यांना देखील गुप्ता यांनी शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान झालेल्या प्रकारानंतर फिर्यादी यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून लेखी पत्र आणून कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बुधवारी आरोपी गुप्ता याला ताब्यात घेतले होते.