
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती : सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी दिल्या जाणाऱ्या खेळत्या भांडवलात वाढ केली आहे. प्रति युनिटसाठी आता २० हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विकास सोसायटीमार्फत अल्प कर्जाचे वाटप सभासदांना करण्यात येते.
जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना २०२३- २४ या अर्थिक वर्षात संकरित गायी व म्हशी पालनासाठी २० हजार रुपये देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. पूर्वी प्रति युनिट १५ हजार रुपये दिले जात होते, त्यात वाढ करण्यात आली आहे. सदर कर्ज शेतकऱ्यांना ७ टक्के दराने देण्यात येणार आहे. तसेच दुभती जनावरे खरेदी करण्यासाठीची कर्ज मर्यादाही वाढविण्यात आली आहे.
प्रति जनावर ६० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येत आहे. याशिवाय सभासदांना पूर्वी एक एकर प्रति युनिट २ जनावरांची मर्यादा होती. त्यात वाढ करून आता प्रति युनिट चार जनावरे करण्यात आली असल्याची माहिती कर्डिले यांनी दिली.