जामखेड मेडिकल हब करण्याचा प्रयत्न – आ. रोहीत पवार

जामखेड – जामखेड शहरात अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय होणार असल्यामुळे तालुक्यातील व आसपासच्या लोकांना उपचारासाठी इतरत्र कोठेही जाण्याची गरज भासणार नाही. सुसज्ज आयसी यु, सीटी स्कॅन, एम आर आय, सोनोग्राफी या सर्व सुविधा नाममात्र शुल्कात होणार आहे. त्यामुळे सध्या रूग्णांना उपचारासाठी रेफर केले जाते हा शब्द लवकरच कालबाह्य ठरेल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, उप संचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे, प्रांताधिकारी अजित थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, डॉ. भरत देवकर यांच्या सह सर्व अधिकारी पदाधिकारी आशा सेविका, सर्व वैद्यकीय कर्मचारी,नागरिक उपस्थितीत होते.
यावेळी मंत्री टोपे म्हणाले, आपण आजारीच पडू नये म्हणून गावा गावात योगा शिबीराचे आयोजन केले पाहिजे तसेच आपला आहार विहार योग्य हवा.
जामखेड उपजिल्हा रुग्णालयाची जशी भव्य दिव्य तीन मजली आयकॉन इमारत असेल आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील विकास कामांसाठी झपाटल्यासारखे काम करत आहेत त्यामुळेच कर्जत-जामखेडची ओळख एक माॅडेल मतदारसंघ म्हणून होईल रोहित पर्व म्हणून राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा लीडरला मतदारसंघाने जपले पाहिजे असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
मेडिकल हब उभारण्याचा प्रयत्न
आमदार रोहित पवार म्हणाले की, ४७ कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची कामाची मुदत दोन वर्षे असली तरी एका वर्षात काम पुर्ण होईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. रूग्णांना व नातेवाईक यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा, जेवण व सुविधा मिळणार आहे यासाठी ३० कोटी खर्च होणार आहे तसेच तालुक्यातील आरोग्य केंद्रांना सेवासुविधा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मिळणार आहे. मतदारसंघात तीन उपजिल्हा रुग्णालय होणार असल्याने मेडिकल हब करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आ. पवार म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. भारस्कर मोरे म्हणाले की, देशातील आरोग्य मंत्र्यांची कामगिरी पाहता देशात सर्वात चांगले काम राजेश टोपे यांचे आहे. तसेच आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातून चार राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. आमदार रोहित पवारांनी आपल्या कामांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेत आयुषचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली.