DNA मराठी

लोकप्रतिनिधी भेटत नसल्याने जनतेचे प्रश्न प्रलंबित…

लोकप्रतिनिधी भेटत नसल्याने जनतेचे प्रश्न प्रलंबित... जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनता दरबार भरविणार....

0 9

नगर : लोकप्रतिनिधी जनतेला भेटत नाहीत, त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी परिवर्तन संवाद यात्रा संपल्यानंतर दर मंगळवारी नगरमध्ये जनता दरबार भरवून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

घन:शाम शेलार यांनी श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदार संघात ३० मार्च पासून परिवर्तन सवांद यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही यात्रा ३१ मार्च पासून नगर तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. नगर तालुक्यातील दौरा संपला. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी प्रकाश पोटे, केशव बेरड, मारुती लांडगे आदी उपस्थित होते. शेलार म्हणाले की, नगर तालुक्यात गेल्या गेल्या ३१ मार्चपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिवर्तन संवाद यात्रा सुरु आहे. श्रीगोंदा मतदार संघातील या ४५ गावांमध्ये फिरताना जनतेच्या मनात खा.सुजय विखे आणि आ.बबन पाचपुते यांच्या विषयी असलेला रोष दिसून आला आहे.

नगर तालुक्यातील ही ४५ गावे शहराजवळ आहेत. परंतु तरीही अनेक गावांत अजून मोबाईलची रेंज येत नाही, विजेचा, पिण्याच्या पाण्याचा, शेतमालाला भावाचा प्रश्न कायम आहे. सीना नदीतील दुषित पाण्यामुळे या गावांतील शेतजमिनीचा दर्जा खालावला आहे.पाण्याचे स्रोत दुषित झाले आहेत. सीना काठच्या गावांतील माणसेच नव्हे तर जनावरेही विहिरी, बोअरवेलचे पाणी पिऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती असताना लोकप्रतिनिधी मात्र याविषयी काहीही बोलत नाहीत व करतही नाहीत. जनतेच्या प्रश्नांचे दायित्व निभावण्यात खासदार व आमदार कमी पडले आहेत. इतकेच नव्हे तर गेल्या साडेतीन वर्षांत ते इकडे फिरकलेही नाहीत. केंद्र व राज्यात सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाविषयी शेतकरी, तरुण वर्गाने प्रचंड संताप व्यक्त केल्याचे शेलार म्हणाले.

Related Posts
1 of 2,494

साकळाईचे गाजर हा चुनावी जुमलाच

साकळाई योजनेची संकल्पना ही माझी असून १९९२ पासून मी ती पुढे आणली. स्वत: अधिकाऱ्यांबरोबर फिरून सर्व्हे करत १९९७ मध्ये १२८ कोटी खर्चाच्या या योजनेचा प्रस्ताव मंजुरीला सरकारकडे पाठविलेला आहे. त्यावेळी युती सरकारमध्ये असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार बबन पाचपुतेंनी संगनमताने ही योजना दाबली होती.असे सांगत त्यास २५ वर्षे लोटल्याने एकदा सर्व्हे झालेला असताना फक्त खर्चाचे आकडे वाढवायचे आणि योजनेला मंजुरी द्यायची एवढेच काम आहे, तरी पुन्हा सर्व्हे साठी २ कोटी मंजूर करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा एक चुनावी जुमलाच आहे असा आरोपही शेलार यांनी केला. जर निवडणुकीपूर्वी त्यांनी योजनेचे काम सुरु केले तर त्यांचा जाहीर सत्कार करू असे खुले आव्हानही शेलार यांनी विखे व पाचपुतेंना दिले.
शरद पवारांच्या उपस्थितीत २ मे रोजी यात्रेचा समारोप
गेल्या ८-१० दिवसांत नगर तालुक्यातील ४५ गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला असून नगर तालुक्यातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी दर मंगळवारी नगरमध्ये राष्ट्रवादी भवनात वेळ देणार आहे. तसेच रविवार पासून श्रीगोंदा तालुक्यात ही यात्रा जाणार आहे. यात्रेचा समारोप राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे २ मे रोजी शेतकरी मेळावा घेवून करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: