सर्वसामान्यांना मोदी सरकारचा आणखी एक झटका; LPG गॅसच्या किमतीत ‘इतकी’ वाढ

दिल्ली – सर्वसामान्यांना आज (शनिवारी) महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची वाढलेली किंमत आजपासून देशभरात लागू करण्यात आली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. याआधी 22 मार्च रोजी घरगुती LPG ची किंमत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढवण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीत अनुदानित 14.2 kg LPG सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आज किंमत वाढवल्यानंतर, दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 999.50 रुपयांवर गेली आहे.
एलपीजीचा वापर कमी झाला
पेट्रोलियम उद्योगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एलपीजीचा वापर मासिक आधारावर 9.1 टक्क्यांनी घसरून 2.2 दशलक्ष टन झाला, जो एप्रिल 2021 च्या तुलनेत 5.1 टक्क्यांनी वाढला आहे. मार्चपूर्वी घरगुती एलपीजीच्या किमतीत गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरला बदल करण्यात आला होता.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ
हे लक्षात घेण्यासारखे आहे की 1 मे रोजी सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 102.50 रुपयांनी महागला आहे. नवी किंमत लागू झाल्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1 मे पासून 2253 रुपयांवरून 2355.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर 1 मे रोजी जेट इंधनही महागले होते. दिल्लीत एअर टर्बाइन इंधनाची किंमत 116851.46 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. यापूर्वी 16 एप्रिल रोजी एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.