
प्रतिनिधी DNA मराठी टीम
शिराळा – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजपासह मोदी सरकारवर (Modi government) टीका केली आहे. आज शिराळा येथे बोलताना शरद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला जात आहे. तर राज्य सरकार वेगळ्या विचारानं काम करत आहे. आजपर्यंत माणसं जोडण्याचं काम झालं. पण आज धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचं काम सुरू आहे. देशासाठी जे हुतात्मा झाले त्यांच्यावर टीका करणारे नेतृत्व देशात बघायला मिळतंय. त्यामुळे देशात अस्वस्थता आहे, असं सांगतानाच आपल्याला आता धर्मांध शक्तींविरोधात काम करावं लागणार आहे. विकासात्मक राजकारणाची या देशाला गरज आहे. राजकारण सुद्धा सर्वसामान्यांना न्याय देणारं हवं, असं शरद पवार यांनी सांगितलं.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला. नव्या वर्षाची आज सुरुवात होत आहे. नाईक यांनी पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला हातभार लावण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच स्वागत आज आपण करतोय. योग्य असेल तर स्वागत करणार. नसेल तर पडेल ती किंमत मोजणार असा हा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहास शिराळा शिवाय पूर्ण होत नाही. शिवाजीराव जिल्हा परिषदेचे यशस्वी अध्यक्ष राहिले आहेत. आज ते पुन्हा घरी येताहेत. घराचं रक्षण करण्याचं सूत्रं त्यांनी स्वीकारलंय. त्यांचं मी स्वागत करतो. नाईक यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य पातळीवर कसा करून घेता येईल याचा विचार झाला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
येत्या चार पाच वर्षात या भागात पाण्यासाठी तहानलेल गाव पाहायला मिळणार नाही. उसाच क्षेत्र वाढतंय. मला काळजी आहे यांचा गळीत कसा होणार. मी आता माहिती घेतली, 90 पेक्षा जास्त कारखाने जून महिन्या पर्यंत चालू राहतील अशी स्थिती आहे, असंही त्यांनी सांगितलं. साखर एके साखर आता चालणार नाही. ब्राझील, अमेरिकेमध्ये इथेनॉलचा वापर वाढतोय. आपल्या पंतप्रधानांनीही त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलीय, असही त्यांनी स्पष्ट केलं.