अनंत गीते यांचे ” ते ” वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे – राष्ट्रवादी

0 188

नवी मुंबई –    माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात ‘सांगता येत नाही, सहन होत नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वक्तव्य केले. पण त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. त्यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खा. सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

शरद पवार हे देशाचे नेते व आघाडीचे जनक आहेत. त्यांचे मार्गदर्शन व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात अत्यंत सक्षमपणे राज्याचा कारभार चालवला जात आहे. कोविड महामारीचा मुकाबला महाराष्ट्र ज्या पद्धतीने उद्धवजींच्या नेतृत्त्वाखाली करतो आहे त्याची प्रशंसा होत असताना कदाचित अडगळीत पडलेल्या नेत्यांना या साऱ्या गोष्टींचे भान राहिले नसेल. म्हणून नैराश्यापोटी गीते यांनी अशी वक्तव्ये केली, असा टोला खा. सुनील तटकरे यांनी यावेळी लगावला.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर आणि विशेषतः मोदी नावाची प्रचंड लाट देशभरात आलेली असताना रायगड, रत्नागिरीच्या जनतेने ज्यांना पराभूत केले ते दोन वर्षे कुठे अज्ञातवासात होते माहित नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची निश्चिती होत असताना शरद पवार उपस्थित होते, त्यावेळी तिथे अनंत गीते ही आले होते. त्यांनी शरद पवारांशी अत्यंत नम्रपणे वागत, त्यांचे आशीर्वाद घेऊन आघाडी केल्याबाबत त्यांचे आभार मानले, त्या घटनेचे आपण साक्षीदार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. काल अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबात जे विधान केले, तशाच पद्धतीचे वक्तव्य १५ दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वक्तव्याला उत्तर देण्याचे धाडस शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर ६ वेळा लोकसभेवर निवडून गेलेले अनंत गीते उत्तर देतील अशी भाबडी आशा सर्व शिवसैनिकांच्या मनात होती. परंतु २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या भाजपच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्ष नेतृत्वाबद्दल चुकीच्या पद्धतीची वक्तव्य केली असताना गळून पडलेला दिसला, असे तटकरे म्हणाले.
Related Posts
1 of 1,654
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिद्धांतावर, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर ठाम विश्वास असणारा पक्ष आहे. देशाच्या राष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अढळ स्थान आहे. हे स्थान कोणा एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे कमी होणार नाही.तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. आगामी काळातही हे सरकार महाराष्ट्रात निश्चित राहील याबाबत संदेह वा शंका नाही. भक्कम विचारांनी स्थापन झालेले हे सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी निश्चितपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असा ठाम विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: