
अहमदनगर : नगर शहरात सध्या दहशत व गुंडगिरीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना बेदम मारहाण केली जात आहे. धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. नगरची (Ahmednagar) बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला जातो आहे.
हे खूप भयावह आहे. यात विशिष्ट लोक दोन गटात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, याकडे आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री या नात्याने जातीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्ष घालून नगर शहरातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे आदेश द्यावेत या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना महाराष्ट्र सहसचिव विक्रम राठोड यांनी दिल्याची माहिती दिली आहे.
संगमनेरमधील कामांसाठी ९१ लाख मंजूर…. आमदार बाळासाहेब थोरात
राठोड यांनी निवेदनात म्हंटले आहे की, मध्यंतरी नगरच्या दोन व्यापाऱ्यांना किरकोळ पार्किंगच्या कारणावरून मारहाण करून त्यांच्यावर तलवारीने हल्ला झाला. काही व्यापाऱ्यांना रस्त्यात किरकोळ भांडणाचे कारण काढून बेदम मारण्यात आले. या विरोधात एक दिवस नगर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना आपली बाजारपेठ निषेध करण्यासाठी बंद करावे लागणे ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. या संदर्भात तीव्र शब्दात निषेध करत असून आपण जातीने लक्ष न घातल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे तरी आपण वैयक्तिक लक्ष घालावे ही विनंती विक्रम राठोड यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.