अहमदनगर एलसीबी मोठी कारवाई; २६ गुन्ह्यात फरार आरोपीला अटक

अहमदनगर – २६ गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपीला अहमदनगर गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch)३ कि.मी पाठलाग करून अटक केली आहे. संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले (रा.बेलगाव ता.कर्जत) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप हा पाच जिल्हयातील एकूण २६ गुन्ह्यात फरार होता. आरोपीला पकडण्यासाठी मोठी शोध मोहिम राबवून पोलिसांनी वंशोतर करून त्याला अटक केल्याची माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीप पवार, पोकाॅ सागर ससाणे व रणजीत जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दि. ११ जून २०२१ रोजी दुपारच्या वेळी घरी असताना अनोळखी पाचजणांनी चाकू, लाकडी काठ्या हातामध्ये घेऊन घरामध्ये घुसून दरोडा टाकला, यावेळी गळ्याला चाकू लावून दमदाटी करुन कपाटाची उचकापाचक करुन ३४ हजार ५०० रु. किं.चे सोने चांदीचे दागिणे चोरुन नेले होते.
Related Posts
या घटनेच्या बाबाजी तुकाराम मोरे (वय ६५, रा. कामटवाडी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस पोलिस ठाण्यात भादविक ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देत गुन्ह्याचा तपास करीत असतांना गुन्ह्यातील आरोपी मिलन उर्फ मिलींद ईश्वर भोसले (वय २३, रा. बेलगांव, ता. कर्जत, ह.रा. वनकूटे शिवार, ता. पारनेर) यास ताब्यात घेतले. तपासा दरम्यान त्याने १ लाख १ हजार ८५० रु. किं. चा मुद्देमाल काढून दिला. गुन्हा हा त्याचे साथीदार संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले, पल्या ईश्वर भोसले, अटल्या उर्फ अतूल ईश्वर भोसले अशांनी मिळून केल्याची कबुलीही त्याने दिली. यामुळे या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) हे वाढीव कलम लावण्यात आली होती.
घटना घडल्यापासून आरोपी फरार झाले होते. आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शोध घेत असतांना माहिती मिळाली कि आरोपी संदीप ऊर्फ संदीप्या भोसले हा पावस, (जि.रत्नागिरी) परिसरामध्ये त्याचे नाव बदलून राहत आहे. मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना अनिल कटके यांनी पथकाला दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पावस ( जि. रत्नागिरी) परिसरात जावून आरोपीचा शोध घेत असताना विजय नारायण भोसले (रा. वाहिरा, ता. आष्टी, जि. बीड) असा नावामध्ये बदल करुन चांदोर, (जि. रत्नागिरी) येथील लाल रंगाचे दगडाच्या खाणीमध्ये मजूर म्हणून कामे करीत आहे अशी माहिती मिळाली.
पोलिस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करून खाणीवर ट्रक ड्रायव्हर व मजूर म्हणून कामगारा सोबत तीन दिवस मुक्कामी राहून काम केले. या कालावधीत आरोपीच्या राहण्याचे ठिकाण बाबत माहिती घेऊन खात्री करून आरोपीच राहते ठिकाणी सापळा लावून पहाटेच्या वेळी छापा टाकून पोलीसांची चाहुल लागताच आरोपी हा पळून जावू लागताच पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा ३ किलो मीटर पाठलाग करून त्याला पकडले. त्याला नांव, पत्ता विचारले असता त्याने सुरुवातीस त्याचे नांव विजय नारायण भोसले (रा. वाहिरा, ता. आष्टी, जि. बीड) असे सांगून तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याची अधिक कसून चौकशी केली असता, त्याने त्याचे खरे नाव संदीप ऊर्फ संदीप्या ईश्वर भोसले (रा. बेलगांव, ता. कर्जत) असे सांगितले. पारनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा व इतर गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेऊन पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.