
२००९ साली हा व्यवहार झाल्यानंतर त्याविषयी कुणी काही विचारणा केली नाही, असं संजय राऊत म्हणाले. “कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली”, असं राऊत म्हणाले आहेत. या कारवाईनंतर संजय राऊतांनी “असत्यमेव जयते” असं सूचक ट्वीट देखील केलं आहे.हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत, असं आव्हान यावेळी संजय राऊतांनी भाजपाला दिलं आहे.
दरम्यान, अशा कारवायांमधून अजून प्रेरणा मिळते, असं राऊत म्हणाले आहेत. “आमचं राहतं घर जप्त केलंय. त्यावर भाजपाचे लोक उड्या मारतायत. बघितलं मी.. फटाके वाजवतायत. मराठी माणसाचं हक्काचं राहतं घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते”, असं राऊत म्हणाले आहेत. “अशा कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं”, असं राऊत यावेळी म्हणाले.