ओंकार भालसिंग याचे हत्येमधील मागच्या दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

प्रतिनिधी- DNA मराठी टीम
अहमदनगर – ओंकार भालसिंग (Omkar Bhal singh)यांच्या हत्येमधील आणि मोक्काचे गुन्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षापासून फरार असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. सचिन चंद्रकांत भांबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २०२० मध्ये ओंकार बाबासाहेब भालसींग, रा. वाळकी, ता. नगर याने वाळकी गावातील चौकामध्ये विश्वजीत प्रतिष्ठानचे वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे वेळी विरोध केला होता. त्याचा राग मनात धरुन विश्वजीत कासार (रा. वाळकी) आणि त्याचे इतर साथीदारांनी १७ नोव्हेंबर रोजी ओंकार भालसींग हा मोटार सायकलवरुन घरी जात असताना त्यास समोरुन चारचाकी वाहनाने धडक देवून खाली पाडून लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याची हत्या केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेने करुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार व त्याचे चार साथीदारांना यापुर्वी अटक केलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी विरुध्द यापुर्वी गुन्हे दाखल असल्याने व सदर आरोपी हे संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने सदर गुन्ह्यास मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी) कलम ३ (१) (i), ३ (२), ३(४) ही कलमे लावण्यात आलेली आहेत.मात्र सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा शोध घेत असताना अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी सचिन हा गिरनारे, जिल्हा नाशिक येथे येणार आहे. या माहितीवरून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गिरनारे येथे आरोपीचा शोध घेत अटक करून नगर तालुका पोलीस CS स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कूमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, अजित पाटील , उपविभगीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.