अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप

श्रीगोंदा – आरोपी नामे सरफराज इकबाल शेख, वय 19 वर्षे, रा. बोरावके नगर, दौंड, ता. दौंड, जि. पुणे याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी मा. विशेष न्यायाधीश एम. एस. शेख साहेब यांनी आरोपी सरफराज इकबाल शेख यास दोषी धरले व त्यास भा.द.वि.का. कलम 376 (2) ( J ) ( N ), अन्वये मरेपर्यंत जन्मठेप व 25000/- दंड,..! दंड न भरल्यास 6 महिने कैद तसेच 506 अन्वये 1 वर्ष सक्तमजुरी व 2000/- रुपये तसेच आरोपी अरबाज भैया खान यास भा.द.वि.का. कलम 506 अन्वये दोषी धरून, 1 वर्ष सक्तमजुरी व 2000/- रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सदर खटल्यामध्ये अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे – गायके यांनी कामकाज पाहिले.
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, माहे जानेवारी 2021 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी/पिडीत मुलगी वय 15 वर्षे 8 महिने 19 दिवस ही एकटीच घरी असताना, तिचा चुलतभाउ आरोपी नामे अरबाज भैया खान हा त्याचा मावस भाउ आरोपी नामे सरफराज इकबाल शेख याला फिर्यादी/पिडीत मुलीचे घरी घेवुन आला. आरोपी अरबाज याने फिर्यादीस तिच्या आई – वडिलांविषयी विचारले असता, पिडीतेने ते बाहेर गेल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपी अरबाज याने पीडित मुलीची आरोपी सरफराज शेख याचेसोबत ओळख करून देवुन त्याच्याशी बोलत जा..! असे सांगितले.
त्यावर आरोपी सरफराज हा पिडीत मुलीस, “ तु मला फार आवडते.. माझे सोबत प्रेम कर. “असे म्हणाला असता पिडीत मुलीने त्यास नकार दिला. त्यावर आरोपी अरबाज याने पिडीत मुलीस, तु जर सरफराज सोबत प्रेम केले नाही.! तर, मी तुझे आई – वडिलांना तुझे सरफराज सोबत अफेअर असल्याचे खोटे सांगेन.” अशी धमकी दिली. त्या भितीपोटी पिडीत मुलीची इच्छा नसताना देखील दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास आरोपी अरबाज व सरफराज शेख हे पिडीत मुलीस अरबाज याचे घरी घेवुन गेले व सरफराज शेख याने पिडीत मुलीवर तिच्या इच्छेविरूध्द बळजबरीने शरीरसंबंध केले.
त्यावेळी अरबाज हा घराचे बाहेर थांबला होता. घटनेनंतर आरोपींनी पीडित मुलीस, “सदर घटनेबाबत कोणाला सांगितले.. तर, तुला व तुझे आई – वडिलांना जीवे ठार मारू ” अशी धमकी दिली. सदर धमकीमुळे पिडीत मुलीने सदरची घटना ही तिच्या घरी सांगितली नाही. त्यानंतर पुन्हा माहे मार्च 2021 रोजी दुपारी 2:00 वाजनेचे सुमारास सरफराज याने पुन्हा पिडीत मुलीवर तिच्या इच्छेविरूध्द शारिरीक अत्याचार केला. परंतु, भितीपोटी पिडीत मुलीने त्याबाबत तिच्या घरी काहीही सांगितले नाही. त्यानंतर बरेच दिवस पिंडीत मुलीची मासिक पाळी न आल्याने तिने त्याबाबत तिच्या आईला सांगितले.
दिनांक 10:6:2021 रोजी पिडीत मुलगी हिच्या वैद्यकीय तपासणीत पिडीत मुलगी ही 22 आठवडयांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत पिडीत मुलीच्या आईने तिला विश्वासात घेवून चौकशी केली असता, पिडीत मुलीने मागील घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. दिनांक 17/6/2021 रोजी दुपारी 2:00 वाजता चाईल्ड लाईनचे सदस्य फिर्यादीचे घरी आले व त्यांनी धीर दिल्याने पिडीत मुलीने तिच्या आईसह श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे जावुन आरोपींविरुध्द फिर्याद दिली.
पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध 376 (2) (F ) (I) (J) (N) , 506 सह 34 आणि पोक्सो कायदा कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास पो. उप निरीक्षक अमित माळी यांनी केला व आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. विशेष न्यायाधीश एम. एस. शेख साहेब यांचेसमोर झाली. नमूद खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे – गायके यांनी काम पाहिले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये फिर्यादी/पिडीत मुलगी, पिडीत मुलीच्या वयाबाबत साक्षीदार ग्रामसेवक, वैद्यकिय अधिकारी, पंच व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी – पुरावा, कागदोपत्री पुरावा तसेच अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे – गायके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, मा. न्यायालयाने आरोपी सरफराज इकबाल शेख यास दोषी धरले व त्यास भा.द.वि. का. कलम 376 (2) (J) (N) , अन्वये मरेपर्यंत जन्मठेप व 25000/- दंड व दंड न भरल्यास 6 महिने कैद तसेच 506 अन्वये 1 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रूपये तसेच आरोपी अरबाज भैया खान यास भा.द.वि.का. कलम 506 अन्वये दोषी धरून 1 वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.सदर खटल्यामध्ये अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे – गायके यांनी कामकाज पाहिले. तसेच, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. दत्तात्रय झराड यांनी सरकार पक्षांस सहकार्य केले.