श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील रिलायन्स गॅस कंपनीमध्ये वॉचमन म्हणून कामाला असलेल्या मच्छिंद्र टोप्या काळे या आदिवासी समाजाच्या व्यक्तीला कंपनीच्या यार्ड मध्ये लावलेला टेम्पो गेटवरून बाहेर सोडला नाही याचा राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गणेश श्रीरंग लगड आणि त्याचा एक पाहूना यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत.
या बाबत सविस्तर असे की गणेश श्रीरंग लगड याचा टेम्पो रिलायन्स गॅस कंपनीला कामगार वाहतूक करण्याकरिता दिलेला असून तो कंपनीच्या यार्ड मध्ये संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आणून लावला होता. रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान गणेश लगड आणि त्याचा एक पाहुणा यार्ड मध्ये लावलेला टेम्पो परत माघारी नेण्यासाठी गेले असता कंपनीचा वॉचमन मच्छिंद्र टोप्या काळे याने साहेबांना फोन लावा आणि टेम्पो घेऊन जा असे सांगितल्याचा राग येऊन गणेश लगड आणि त्याच्या पाहुणा या दोघांनी मच्छिंद्र काळे या आदिवासी समाजाच्या व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ करत तू लय इमानदार झाला काय, तू आम्हाला शिकवतो काय असे म्हणत त्याचा व तेथेच उभा असलेला दुसरा वॉचमन वेदपाठक या दोघांच्या हातात असलेली काठ्या हिसकावून घेत काळे याला पाठीत तसेच डोक्यात काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत काळे याचे डोके फुटून पाठीला मुका मार लागला आहे.
यावेळी मच्छिंद्र काळे याची पत्नी सविता ही त्याला सोडविण्यासाठी आली असता तिला देखील गणेश लगड याने मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गणेश श्रीरंग लगड आणि त्याचा एक पाहूना यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव हे तपास करत आहेत.
रिलायन्स गॅस कंपनीच्या यार्डमध्ये मी वॉचमन म्हणून काम करत असल्याने मी माझे काम इमाने इतबारे पार पाडत होतो मात्र गणेश लगड यांनी मी आदिवासी समाजाचा व अल्पसंख्यांक असल्याने माझ्यावर जातीवाचक शिवीगाळ करत मला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप पर्यंत आरोपी असलेल्या गणेश लगड याला अटक झालेली नाही येत्या दोन दिवसात आरोपीला अटक नाही झाली तर मला न्याय्य मिळण्यासाठी मी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे असा इशारा मच्छिंद्र काळे यांनी दिला.