
आ. नीलेश लंके सकाळी सव्वा सहालाच बांधावर
नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांना दिला धीर : केवळ पंचनामे नको, तात्काळ मदत देण्याची मागणी
पारनेर : रविवारी सायंकाळी तालुक्यातील वनकुटे, पळशी तसेच खडकवाडी येथे वादळी वारा, गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमधील उभ्या पिकांसह घरांची मोठया प्रमाणावर पडझड झाली. आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी सकाळी सव्वासहालाच शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.
रविवारी सायंकाळी विटा, खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीस आ. लंके यांनी हजेरी लावली होती. तेथून सोमवारी पहाटे साडेपाच वाजता हंगे येथे पोहचल्यांनतर चालकास सोडून दुसऱ्या चालकासोबत आ.लंके यांनी थेट वनकुटे गाठले.
सव्वा सहाच्या सुमारास त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास सुरूवात केली. वनकुट्यात भागाराम पायमोडे या शेतकऱ्याचे चार एकर कांद्याच्या पिकाचा गारपिटीमुळे अक्षरशः चिखल झाला. आ. लंके यांनी भेट घेतल्यानंतर वयोवृध्द पायमोडे यांना आश्रू अनावर झाले.
गेल्या शंभर वर्षात असे संकट आले नव्हते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आ. लंके यांनी पायमोडे यांना धिर देत शासनाची मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.