जलजिवन योजनेंतर्गत चालु असलेल्या 155 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; अनेक चर्चांना उधाण

करंजी – पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळी गावांचा कायमचा पाणी प्रश्न सुटावा म्हणुन जलजिवन योजनेंतर्गत चालु असलेल्या १५५ कोटी रुपयांच्या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे चालु असुन शासनाचे १५५ कोटी रु. या भागातील गावांची तहान न भागविता वाया जाणार.
पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायमचा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो. या भागातील अनेक गावात दरवर्षी पिण्याचे पाण्याचे संकट उभे असते. या भागातील ४३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणुन या मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जलजीवन योजनेंतर्गत पाठपुरावा करुन १५५ कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन घेतला.
३१२ किलोमिटर लांबीच्या या योजनेचे पाईप लाईन गाडण्याचे काम अनेक गावात वेगाने चालु आहे. प्रत्यक्षात ७५ से.मी.खोल चर खोदुन पाईप गाडायचे असताना २८ ते ३० सें.मी. चर खोदुन हे पाईप गाडण्याची घाई करण्यात येत असुन गाडण्यात येणाऱ्या पाईपविषयी गावा-गावातील नागरिकात संशय व्यक्त केला जात आहे.
जमिनीपासुन वर-वर गाडण्यात आलेली पाईप लाईन शेतकऱ्यांच्या नांगराचा अथवा वाहनानेसुध्दा फुटु शकते. आतापर्यंत या भागासाठी वांबोरी पाईप लाईन योजना व मिरी प्रादेशिक पाणी अशा दोन योजना होवुनही या गावांना पाणी मिळण्यात सातत्य दिसलेच नाही. पाईप लाईनची फुटतुट,कायम गळती यामुळे या योजना नियमित चालल्या नाहीत.
मागील योजनेसारखेच या योजनेचे काम होणार असेल तर कितीही योजना झाल्या तरी या गावांनी तहान कधीच भागणार नाही, त्यामुळे या जलजिवन योजनेच्या कामाची पहाणी करुन चौकशी करावी अशी मागणी ॲड. संदिप अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राजेंद्र अकोलकर, महादेव अकोलकर, विठ्ठल मुटकुळे, शंकर आठरे, बाळासाहेब मुखेकर, अश्विन मुटकुळेसह अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.
जलजिवन योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील ४३ गावांचा समावेश असलेल्या योजनेचे काम वेगाने चालु आहे. या योजनेच्या पाणी लाईन खोदाईबाबतच्या तक्रारींची आपण दखल घेवुन हे काम चांगले करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत-मृणाल धगधगे (उपअभियंता जिवन प्राधिकरण, नगर)