संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी


मुंबई : शरीरात गुडघे, खांदे किंवा शरीराच्या इतर भागातील सांधे दुखत असल्यास किंवा सांध्यांना सूज येत असल्यास सतर्क व्हा, कारण हे दुखणं संधीवात असण्याचं लक्षणं असू शकतं. संधीवात हळूहळू वाढत जाऊन चालण्या-फिरण्यासही समस्या होऊ शकते. शरीरात वाढणारं यूरिक ऍसिड संधीवाताचं प्रमुख कारण ठरु शकतं. यूरिक ऍसिडचे कण हळूहळू सांध्यांमध्ये जमा होतात आणि त्यानंतर दुखणं आणि सूज वाढू लागते.
संधीवातासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. संधीवातासाठी आलं आणि ओवा हे पदार्थ गुणकारी ठरतात. एका भांड्यात दीड कप पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा ओवा आणि एक इंच आल्याचा तुकडा कुटून टाका. हे मिश्रण 6 ते 7 मिनिटं उकळवा. ओवा आणि आल्याचा अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर हे पाणी गाळून प्या.
दिवसातून दोन वेळा हे पाणी पिऊ शकता. यामुळे शरीरात घाम येईल आणि यूरिक ऍसिड नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होईल.