शहरातील खड्डे बुजवा अन्यथा मनपा सत्ताधार्यांच्या विरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन – किरण काळे यांचा इशारा

अहमदनगर – नगर शहराच्या सर्वच परिसरामधील रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत. पावसाळा जोरदार असल्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. नागरिकांना यामुळे मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. १५ दिवसांच्या आत जर महानगरपालिकेने खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.
नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील खड्ड्यांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करावी. याबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. परंतु दिव्याखालीच अंधार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुलीनिर्देश करण्यापूर्वी नगर शहरामध्ये मनपातील सत्ताधारी स्वतः काय दिवे लावत आहेत याचा त्यांनी आधी विचार करायला हवा.
१५ दिवसांच्या आत महामार्गांवरील खड्डे बुजवले नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांनी नगर शहरातील खड्डे १५ दिवसांच्या आत बुजवले नाही तर नगर शहरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, असा खोचक सल्ला किरण काळे यांनी महापौर यांचे नाव न घेता त्यांना दिला आहे.
सध्या पावसाने जोर धरला आहे. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक नागरिकांना अपघातांचा अनुभव येत आहे. अपघातातील दुखापतीमुळे कोरोनाच्या संकट काळामध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. महापालिकेने वेळीच जागे व्हावे. अन्यथा काँग्रेस आपल्या पद्धतीने खरपूस समाचार घेईल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.