वेश्याव्यवसाय हा कायद्यानुसार गुन्हा नाही – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मागच्या सप्टेंबर मध्ये मुंबईच्या मालाड परिसरातील चिंचोली बंदर येथून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची मुंबई पोलिसांनी सुटका केली होती. त्यानंतर २०, २२ आणि २३ वर्षीय मुलींना मुंबई दंडाधिकारी कोर्टासमोर हजर करण्यात आले होते . कोर्टाने या मुलींची रवानगी महिला वसतिगृहात केली आणि प्रोबेशन ऑफिसर कडून त्यांनी याबाबत रितसर अहवाल मागवला होता. मॅजिस्ट्रेट कोर्टाने या महिलांचा ताबा त्यांच्या पालकांना देण्यास नकार दिला आणि या महिलांना उत्तर प्रदेश येथील महिला वसतिगृहात ठेवण्याचे आदेश दिले होते .
कानपूर मधील विशिष्ट समाजातील मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जाते तशी तेथील परंपराच असल्याचे संबंधित अधिकाऱ्यानं या अहवालात सांगितलं. त्यामुळे सुटका करत त्यांना त्यांच्या घर पाठवणं हे त्यांच्या हिताचं नाही, असं स्पष्ट करत या महिलांची मागणी फेटाळून लावण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने कायम ठेवला. त्यानंतर अॅड. अशोक सरोगी यांच्यामार्फत सदर महिलांनी हायकोर्टात दाद मागितली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी हायकोर्टाने मॅजिस्ट्रेट आणि दिंडोशी न्यायालयाचे आदेश रद्द करत याचिकाकर्त्या महिलांना दिलासा देत वस्तीगृहातून मुक्त करण्याची त्यांची मागणी मान्य केली आहे .
न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी या महिलांची मागणी मान्य करत उत्तर प्रदेश येथील महिला वस्ती गृहातून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सदर महिला या सज्ञान असून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार राहण्याचा अधिकार आहे. भारतात कुठेही त्या फिरू शकतात, एवढेच काय तर घटनेने त्यांना त्यांचा व्यवसाय निवडण्याचाही अधिकार देखील दिला आहे. असे न्यायमूर्तींनी आदेशात म्हटले आहे. वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हा नाही तसेच प्रत्येक व्यक्तीला त्यांचा व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिलासा दिला आहे.