विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय जनता पक्षाने ने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकी मध्ये रंगत वाढली होती परंतु आपल्याला कोर्टाने बोलावले नाही असे सांगत विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु केली आणि विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेनाचे डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे.
भाजप कडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती . विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो” असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले. विरोधीपक्षांनी कोविड काळात उपसभापती निवडणुकीला स्थगितीसाठी जी याचिका केली होती, त्यावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे.
७८ सदस्यीय विधान परिषदेत १८जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित ६० पैकी २३ सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना १५, राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, लोकभारती १ असे ३३ आमदारांचे संख्याबळ आहे.