राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकार वर हल्ला

नवी दिल्ली – मागच्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमावादाचा मुद्दा देशात राजकारण तापला आहे . विरोधी पक्षांकडून सातत्यानं याबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. अखेर आज सांसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. चीननं लडाखमधील भारतीय जमीनीवर कब्जा केल्याचं सिंह यांनी सांगितलं. सिंह यांच्या माहितीचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर ट्विट करून निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले .
लडाखमधील भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीनीवर चीननं कब्जा केला आहे. त्याशिवाय १९६३ साली झालेल्या एका तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्ताननं (POK) मधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनच्या ताब्यात दिला आहे अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.
राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रश्नही विचारले आहेत. संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालंय की, मोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली आहे . आपला देश नेहमी लष्करासोबत उभा होता आणि राहिल. पण, मोदीजी, आपण केव्हा चीन विरोधात उभे राहणार आहात ? चीन कडून आपल्या देशाची जमीन कधी परत घेणार? चीनचं नाव घ्यायला घाबरू नका, अश्या शब्दात राहुल गांधीने पंतप्रधान नरेंद मोदी वर हल्ला केला आहे.
दरम्यान आज संसदेत रक्षा मंत्री राजनाथ सिह यांनी आपल्या जवानांचं संयम आणि शौर्याचं उदाहरण दिले ते म्हणाले की मी देखील लडाखला जाऊन आपल्या शूरवीरांसोबत काही वेळ व्यतीत केला. मलाही त्यांचं साहस शौर्य आणि पराक्रम जाणवला हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर चीनकडून सेनेची संख्या तसंच युद्ध सामग्रीच्या संख्येत वाढ दिसून आली. १५ जून रोजी चीनविरुद्ध गलवानमध्ये रक्तरंजित संघर्षात आपल्या जवानांनी बलिदान दिली आणि चिनी पक्षालाही मोठं नुकसान झालं.
२९-३० ऑगस्ट रोजी पॅन्गाँग सरोवरच्या दक्षिण भागात यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय सेनेनं त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. द्विपक्षीय संबंधाचा चीनकडून अनादर झाल्याचं यातून स्पष्टपणे दिसतंय. वास्तविक नियंत्रण रेषेचा १९९३-१९९६ च्या करारात स्पष्ट रुपात स्वीकार करण्यात आलाय. परंतु, चीनकडून हा करार मोडण्यात आला, त्यांनी केलेल्या कारवाईमुळेच सीमेवर संघर्ष घडून आला. भारतीय जवानांनी जिथे संयमाची गरज होती तिथं संयम राखून तर जिथं शौर्याची गरज होती तिथं शौर्याचं उदाहरण दिलंय, असंही राजनाथ सिंह यांनी आपल्या संसदेच्या आजच्या भाषणादरम्यान म्हटलं