DNA मराठी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली

0 187

मुंबई – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली.

गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली.

त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेकदा वादळातील नौका किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

उत्तम पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यात होती, पण ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत.

Related Posts
1 of 2,525

प्रणवबाबू आपल्यातून निघून गेले. त्यांचा प्रभाव देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ काळ राहील. महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी त्यांना आदरांजली वाहत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

प्रणव मुखर्जींचा थोडक्यात राजकीय प्रवास 

१९६९ साली प्रणव मुखर्जी पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झाले. १९७३ साली त्यांना पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, तर १९८४ साली ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले. २००४ साली प्रणवदा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकले. 

२०१९ साली प्रणव मुखर्जींना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २००८ साली त्यांना पद्म विभूषण, १९९७ साली सर्वश्रेष्ठ खासदार आणि १९८४ साली सर्वश्रेष्ठ अर्थमंत्री असे पुरस्कार प्रणव मुखर्जींना मिळाले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: