मिरजगाव येथे १५ दिवसात ४५ लाख रुपये मातीत, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा – सचिन पोटरे

कर्जत- अहमदनगर सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथे झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.
अहमदनगर सोलापूर महामार्गावर सर्वत्र खडयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात या महामार्गाची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. मिरजगाव गावात १२०० मिटर रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. यासाठी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. हे काम झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसांत या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मिरजगाव येथील खराब रस्त्यामुळे लहान मोठे अनेक अपघात होत आहे. या मध्ये लोकांचे बळी जात आहेत. पावसाळ्यात खड्डे तर उन्हाळ्यात धुळ या प्रकाराने मिरजगावकर वैतागून गेले आहेत.
पावसाळ्यापूर्वी हे काम सुरू असताना कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी तक्रार केली होती. पण आमदार रोहित पवार यांनी अधिकारी व ठेकेदार यांना कामाच्या दर्जा बाबत सुचना करण्या ऐवजी त्यांना पाठीशी घालत. या कामाचा नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. रोहित पवार यांनी निवडणूकीत मतदारसंघात कामे दर्जेदार करा जो ठेकेदार दर्जेदार काम करणार नाही अशा ठेकेदाराची खैर नाही, काळ्या यादीत टाकू असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला होता.