माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्वांचा सहभाग हवा- मुख्यमंत्री

मुंबई – आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा आरक्षण प्रश्नी सरकार गंभीर असून सर्वांना सहभागी करून घेत कायदेशीर लढाई अधिक चिवटपणे लढू व मार्ग काढू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सणासुदीच्या काळात सर्वधर्मियांनी दाखविलेल्या संयमाबद्दल धन्यवाद दिले. कोरोनाचे संकट वाढत असताना पुनश्च हरिओम म्हणत जनतेचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोरोनाशी दोन हात करण्याच्या प्रक्रियेत शासन आता सर्वसामान्यांना सहभागी करुन घेणार आहे. यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे.
यासाठी प्रत्येक मतदारसंघात आरोग्य, महसूल यांच्यासह इतर शासकीय विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके नेमण्यात येणार असून ही पथके किमान दोन वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कुणाला काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोरोना विरुध्दच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्वाचे असून प्रत्येकाने आरोग्याविषयक छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यात बाहेर जातांना मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे, बंदीस्त जागेऐवजी हवा खेळती असणाऱ्या ठिकाणी थांबणे, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् मध्ये समोरासमोर न बसता अंतर राखणे, सार्वजनिक वाहतूक किंवा स्वच्छतागृहांचा वापर करतांना काळजी घेणे यासह आरोग्य विभागाककडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करायला हवे.
राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये याकरिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आतापर्यंतच्या महाभयानक अशा संकटाचा सामना आपली पिढी करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या पुढील काळातही अशी संकटे येण्याचा इशारा दिला आहे. त्या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी हा अनुभव आपल्या कामी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी संसर्गाची साखळी तोडतानाच आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी शासन विविध पावले उचलत असून राज्यातील रुग्णालयातील खाटांची संख्या साडेसात हजारावरून ३ लाख ६० हजारापर्यंत वाढविण्यात आली आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्धता ही प्राथमिकता ठरविण्यात आली असून ऑक्सिजन उत्पादनांच्या ८० टक्के उत्पादन रुग्णालयांना उपलब्ध करुन देणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. तसेच विविध भागात जम्बो हॉस्पिटलसारख्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.